- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच गावकऱ्यांच्या सहकार्यातून वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट झाला. या शाळेला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळाल्यानंतर निती आयोगाकडून आता वर्गखोली बांधकामासाठी अडीच कोटींचा निधी मिळाला. या निधीमधून ३६ एकर परिसरात ही शाळा प्रत्यक्षात साकारली जाणार आहे.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे खासगी शाळेच्या तुलनेत दर्जेदार नसते, हा सर्वसामान्य नागरिकांचा समज चुकीचा ठरवित साखरा जिल्हा परिषद शाळेने एक नवा आदर्श घडविला. येथे पूर्वप्राथमिक ते आठवीपर्यंत वर्ग असून,सर्वांच्या सहकार्यातून या शाळेला दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळाला. त्यानंतर साखरा गाव परिसरात शासनाची ‘इ-क्लास’ ३६ एकर जागा या शाळेच्या नवीन इमारतीसाठी महसूल प्रशासनाने रितसर दिली. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी व दानशूरांनी जवळपास २५ ते ३० लाखाची लोकवर्गणीही केली. वर्गखोली बांधकामासाठी निती आयोगाकडून निधी मिळाला यासाठी जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केला. आता अडीच कोटींचा निधी मिळाला असून, प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर ३६ एकर परिसरात या शाळेचे बांधकाम केले जाणार आहे. राज्य सरकारने या शाळेतील शिक्षणासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन केलेले असून, त्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. ३६ एकर परिसरात उभारल्या जाणार या शाळेत भव्य ग्रंथालयही राहणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांसह केंद्र प्रमुख, गावकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, दानशूर यांच्या सहकार्यातून साखरा जि.प. शाळेचे नाव राज्यात झळकले, असे शाळा प्रशासन अभिमानाने सांगते.साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्वप्राथमिक ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. येथे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबतच्या ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेत मांडला होता. सर्वसाधारण सभेने या ठरावाला मंजूरी दिली. त्यामुळे येथे पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण मिळणार आहे. पूर्वप्राथमिक वर्गात आॅनलाईन पद्धतीने व गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यावर्षीही पूर्वप्राथमिक वर्गात आॅनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात आलेले आहेत.