लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सर्व शाळा बंद आहेत. दरम्यान, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत फार काळ व्यत्यय नको म्हणून मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील शासकीय आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देणे गत आठवड्यापासून सुरू केले आहे. या कामी मुख्याध्यापक संतोष काळपांडे यांनी पुढाकार घेतला आहे.कोरोना विषाणूने भारतात महाराष्ट्रातही थैमान घातले असून, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाउन व संचारबंदी लागू केली असून इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता शाळा थेट २६ जूनलाच सुरू होणार आहेत. हा कालावधी जास्त असल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक तुटू नये म्हणून शासकीय आश्रमशाळा शेलुबाजारचे मुख्याध्यापक संतोष काळपांडे यांनी ‘स्टडी, लर्न फ्रॉर्म होम’ ही संकल्पना अंमलात आणली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाºया या आश्रमशाळेनेही शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच प्रकल्प अधिकारी अकोला यांचे सूचनेनुसार अधिकारी-शिक्षक-पालक-विद्यार्थी यांचा सर्वसमावेश असलेला ‘व्हाट्सअप गट’ तयार करून विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन अभ्यास देत आहेत. याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसादही मिळत आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच वेळोवेळी शाबासकी दिल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे आणि ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांनाही एसएमएस करून किंवा फोन करून अभ्यास देण्याचे नियोजनही केल्याचे मुख्याध्यापक काळपांडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:54 AM