वाशिम : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द झाल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला. पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात लढा उभारू, असे प्रतिपादन पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी आयोजित चर्चासत्रात केले.
प्रा. जोगेंद्र कवाडे हे वाशिम येथे आले असता, कास्ट्राईब शिक्षक संघटनेने त्यांचे स्वागत करून विविध विषयांवर चर्चा केली. मागासवर्गीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण राज्य सरकारने रद्द केले आहे. याचा फटका मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसत आहे. यासंदर्भात पीरिपाच्या वतीने वाशिमसह राज्यभरात आंदोलने करण्यात आली. वाशिम येथे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते. या मुद्द्याच्या अनुषंगाने १४ सप्टेंबर रोजी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेशी चर्चा केली. यापुढेही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षणासाठी लढा उभारू, अशी ग्वाही प्रा. कवाडे यांनी दिली. यावेळी पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळराव आटोटे, राज्याध्यक्ष चरणदास इंगोले, सरकार इंगोले यांच्यासह कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवराव वैद्य, कार्याध्यक्ष संतोष पट्टेबहादूर, उपाध्यक्ष विनोद मनवर, सरचिटणीस मिलिंद अंभोरे, प्रभुजी मोरे, सुभाष सरतापे, तुकाराम इंगळे, प्रकाश कांबळे, मोहन कांबळे , रवींद्र वानखेडे, विजय पट्टेबहादूर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.