वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, काही ठिकाणी नात्या-गोत्यातच लढती होत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अनसिंग येथे सख्खे मावस भाऊ, तर सोहळ (ता. कारंजा) येथे सख्ख्या चुलत जावांमध्ये लढत होत आहे.
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक होत आहे. ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५२ ग्रामपंचायतींमधील लढती लक्षवेधक ठरत आहे. काही ठिकाणी नात्यागोत्यातील माणसे एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने मतदारांसह नातेवाइकांसमोरही पेच निर्माण होत आहे. वाकद (ता.रिसोड) येथे वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये भावकीमध्ये लढत होत असून, या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या ठिकाणी अमोल प्रदीपराव देशमुख व धनंजय भगवानराव देशमुख यांच्यात चुरशीची लढत होत आहे. कवठा (ता. रिसोड), अनसिंग (ता.वाशिम), सोहळ (ता.कारंजा) येथेही नात्यागोत्यातील उमेदवारँमध्ये लढत होत असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
००००
कवठा येथील लढत
रिसोड तालुक्यातील कवठा येथील ग्रामपंचायतची निवडणूक चुरशीची होत आहे. वाॅर्ड क्रमांक एकमध्ये काकूविरूद्ध पुतण्या अशी लढत आहे. रिसोड पंचायत समितीच्या सभापती गीता हरीमकर या कवठा गावातील रहिवासी आहेत. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये शारदा तुळशीराम हरिमकर (काकू) यांच्याविरोधात अनिल पुंजाजी हरिमकर (पुतण्या) उभे आहेत.
०००
अनसिंग येथील लढत
वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच अटी-तटीची होत असते. यंदाही निवडणूक अटी-तटीची होत असून, सख्खे मावस भाऊ एकमेकांविरुद्धलढत देत आहेत. बंडू वानखेडे व नंदू सातव या मावस भावांमध्ये चुरशीची लढत होत असून, यात मतदार कुणाला पसंती देतात, याकडे लक्ष लागून आहे.
००
सोहळ येथे सख्ख्या चुलत जावांमध्ये लढत
कारंजा तालुक्यातील सोहळ येथील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून, सख्ख्या चुलत जावांमध्ये लढत होत आहे. नात्यागोत्यातील या लढतीमुळे प्रचार कुणाचा करावा व मतदान कुणाच्या बाजूने करावे,असा पेच नातेवाइकांसमोर निर्माण होत आहे. अर्चना किशाेर उगले आणि सुरेखा संतोष उगले या जावांमध्ये होत असलेली लढत चुरशीची बनत आहे. यामध्ये विजयी कोण होणार? याकडे लक्ष लागून आहे.