वाशिम, दि. ४- बारावीचा पेपर सोडवून दुचाकीने घरी परतणार्या विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. काटा मार्गावरील चौफुलीवर झालेल्या अपघातात शंकर सुर्वे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान घडली. चिखली सुर्वे येथील शंकर निळकंठ सुर्वे (वय १८) व वाघजाळी येथील वैभव उध्दवराव इढोळे (वय १८) हे दोघे बारावीत शिकतात. शनिवारी राज्यशास्त्राचा पेपर असल्याने दोघेही दुपारी घरुन दुचाकीने काटा येथील परीक्षा केंद्रावर गेले होते. सायंकाळी ६ वाजता पेपर सुटल्यानंतर दोघेही दुचाकीने घरी परत येत असताना वाशिम पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चौफुलीवर ट्रॅक्टरने मोटरसायकलला जबरदस्त धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, शंकर सुर्वे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वैभव ईढोळे गंभीर जखमी झाला. वैभवला तत्काळ अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद नव्हती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळाच्या हद्दीबाबत संभ्रम ! ग्रामीण पोलीस स्टेशनची हद्द शहरापासून पाच कि.मी. अंतरावर असल्याचे फलक लावण्यात आले. परंतू अनेक घटनांमध्ये हद्दीसाठी शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांमध्ये नेहमीच संभ्रम होतो. या संभ्रमामुळे घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी बराच विलंब होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. पोलीस अधिक्षकांनी पोलीस स्टेशन हद्दीबाबत दोन्ही पोलीस स्टेशनला स्पष्ट सूचना दिल्यास हा संभ्रम कायमचा दूर होऊ शकतो.
पेपर सोडवून परतणा-या विद्यार्थ्यावर काळाचा घाला !
By admin | Published: March 05, 2017 2:14 AM