वाशिम : दात्यांकडून घेतलेले रक्त व त्यामधील घटकांवर प्रक्रिया करून ते सुरक्षितपणे साठविण्याची प्रक्रिया खर्चिक बनल्यामुळे रक्ताचे दर दुप्पटीकडे झेपावले आहेत. केंद्र शासनाने जानेवारी महिन्यामध्येच सुधारित दरपत्रक जारी केले होते. त्यापाठोपाठ राज्य शासनानेही सुधारित दरपत्रक जारी केले असून त्यामध्ये अवघ्या ८५0 रुपयांना मिळणार्या रक्तपिशवीची मूळ किंमत तब्बल १ हजार ४५0 रुपये करण्यात आले आहेत. रक्त म्हणजे जीवन. वेळेत आणि सुरक्षित रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. मग तो गरीब असो अथवा श्रीमंत! आज रक्ताचे दर वाढल्यामुळे जीवनच महागले, अशा प्रतिक्रिया रुग्णांकडून ऐकावयास मिळत आहेत. रक्ताचे दर वाढविण्याच्या मागणीसाठी दि फेडरेशन ऑफ नागपूर ब्लड बँकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने राज्य रक्त संक्रमण परिषदेने एक समिती गठित केली. या समितीमध्ये खासगी रक्तपेढी, रेडक्रॉस, शासकीय रक्तपेढी व अन्न व औषधी प्रशासनाच्या प्रतिनिधींसह एकूण १६ सदस्यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या पाहणीमध्ये रक्तसंकलनानंतर रक्त व रक्तघटकांवर करावी लागणारी प्रक्रिया अधिक खर्चिक बनल्याचे निदर्शनास आले. तसेच अद्ययावत यंत्रांद्वारे तपासण्या केलेले रक्त रुग्णांना पुरविण्यासाठी रक्तपेढ्यांना न परवाडणार््या दरात वितरित करावे लागत होते. याचा परिणाम रक्ताच्या सुरक्षिततेवरही जाणवत होता. अभ्यास समितीने या बाबी राज्य रक्त संक्रमण परिषदेसमोर मांडल्यामुळे रक्ताचे दर वाढविण्याचा निर्णय झाला असुन सदर परिपत्रक जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाले आहे.
जीवनदान महागले!
By admin | Published: June 21, 2014 12:09 AM