गतवर्षी ३ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सातत्याने रुग्ण आढळले; मात्र परिस्थिती बहुतांशी नियंत्रणात होती; मात्र त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने चढला आहे. या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकवेळ ९ ते १५ मे या कालावधीत कडक निर्बंध लाऊन दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. असे असताना पेट्रोलची दरवाढ मात्र सातत्याने सुरूच आहे. १९९१ मध्ये असलेला पेट्रोलचा १४.६२ रुपये प्रती लिटरचा दर आजमितीस ९८.३६ रुपये प्रती लिटरवर पोहोचला आहे. यामुळे वाहनचालकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
................
ग्राफ
पेट्रोल दर (प्रती लिटर)
१९९१ - १४.६२
२००१ - २८.७०
२०११ - ६३.०८
मे २०२१ - ९८.३६
...............
मोठ्या प्रमाणातील टॅक्समुळेच पेट्रोल महागले
केंद्र सरकारकडून पेट्रोलवर ३२.९८ रुपये प्रति लिटरचा कर आकारला जातो. असे असताना राज्य सरकारही त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किमतीवर २५ टक्के ‘व्हॅट’ लावते. त्यातही पेट्रोलवर १० रुपये प्रती लिटर इतका सेस लावण्यात येतो. यामुळेच पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
....................
कोट :
पुन्हा सायकलवर फिरावे लागणार
पेट्रोलच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे वाहन चालविणे आता अशक्य होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला, तर काही दिवसांत पुन्हा सायकलवरच फिरावे लागणार असल्याचे निश्चित आहे.
- अविनाश मुळे
...............
३० वर्षांपूर्वी पेट्रोलचे प्रती लिटर दर केवळ १४ ते १५ रुपये होते. अगदीच १० वर्षांपूर्वीदेखील हे दर आटोक्यात (६३ रुपये) होते; मात्र सध्या शंभरीच्या आसपास दर पोहोचले असून, वाहन चालविणे अशक्य ठरू लागले आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
- महेश धोंगडे
.................
दुचाकी, चारचाकी वाहन ही आजघडीला जीवनावश्यक बाब झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक महत्प्रयासाने बॅंकांकडून कर्ज घेऊन वाहन खरेदी करतात; मात्र पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने ते हैराण झाले आहेत.
- सचिन आळणे