लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सरकारी दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णास तेथील रक्तपेढीतून गरज असल्यास मोफत रक्त मिळते; मात्र ‘ब्लड टेस्टींग चार्जेस’चा खर्च लागत असल्याने खासगी रक्तपेढीला त्यासाठी पैसे द्यावे लागतात. गोरगरिब रुग्ण यामुळे त्रस्त असतात. ही बाब लक्षात घेऊन वाशिम येथील ‘मोरया ब्लड डोनर ग्रुप’च्या युवकांनी स्तुत्य उपक्रम हाती घेऊन शहरातील प्रतिष्ठानांवर ‘लाईफ सेव्ह बॉक्स’ लावणे सुरू केले आहेत. यामाध्यमातून गोळा होणारा निधी गरजू रुग्णांना रक्त विकत घेण्यासाठी दिला जाणार आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना मोरया ब्लड डोनर ग्रुपचे महेश धोंगडे यांनी सांगितले, की शहरांसोबतच ग्रामीण भागातील गोरगरिब व गरजू रुग्णांना रक्त दान करण्यासाठी ग्रुपने ५ ते ६ हजार रक्तदात्यांची यादी गोळा केलेली आहे. त्यामुळे जेव्हा कधी कुणालाही गरज असल्यास रक्त दान केले जाते. असे असले तरी रुग्ण शासकीय रुग्णालयात भरती असेल तरच त्यास रक्तपेढीतून मोफत रक्ताचा पुरवठा केला जातो. रुग्ण बाहेरच्या दवाखान्यात भरती असेल आणि शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीतून त्यास रक्त घ्यायचे असेल तर मात्र त्यासाठी ५०० रुपये द्यावे लागतात. तसेच खासगी रक्तपेढीत ब्लड डोनर असल्यास १०५० आणि ब्लड डोनर नसल्यास १४५० रुपये भरावे लागतात. ही खर्चीक बाब अनेक गोरगरिब कुटूंबांना परवडणारी नसते. त्यामुळे अशा रुग्ण व त्यांच्या कुटूंबांच्या मदतीसाठी मोरया ब्लड डोनर ग्रुपने शहरातील प्रतिष्ठानांमध्ये लाईफ सेव्ह बॉक्स बसविणे सुरू केले आहे. यामाध्यमातून गोळा होणाऱ्या निधीतून रक्तासाठी लागणारा खर्च भागविला जाणार आहे. त्याच्या रितसर पावत्या त्या-त्या प्रतिष्ठानांना दिल्या जाणार असल्याचे महेश धोंगडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
५० लाईफ सेव्ह बॉक्स मोरया ब्लड डोनर ग्रुपकडे सद्या ५० लाईफ सेव्ह बॉक्स असून त्यातील काही बॉक्स वाशिम शहरातील प्रतिष्ठानांवर लावण्यात आले आहेत. गोरगरिबांना यामाध्यमातून रक्त घेण्यासाठी मदत केली जाणार असल्याने दानदात्यांनी या उपक्रमास आपापल्या परीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा महेश धोंगडे यांनी व्यक्त केली.