लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वादळवारा व अवकाळी पावसादरम्यान आकाशातून चकाकत येणाºया विजेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कधीकाळी चारठिकाणी वीज अवरोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले होते. मात्र, आजमितीस चारही ठिकाणचे हे यंत्र निकामी ठरले असून जिवीतहानीचा धोका यामुळे बळावला आहे. गेल्या दोन वर्षात वीज अंगावर पडल्याने अनेकांचा बळी गेला आहे. याशिवाय मुक्तपणे वावरणाºया जनावरांनाही जीव गमवावा लागला. दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यात वातावरणात अचानक बदल होवून वादळवारा, अवकाळी पाऊस होत असल्याचा अनुभव गत काही वर्षांमध्ये जिल्हावासी अनुभवत आहेत. याचदरम्यान प्रामुख्याने ढगांचा गडगडाट होऊन आकाशातून जमिनीकडे आकर्षित होवून विजा पडण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. यावर काहीअंशी प्रतिबंध असावा, या हेतूने जिल्ह्यात वाशिम शहरातील जुने नगर परिषद कार्यालय, वारा जहाँगीर (ता. वाशिम), भुलोडा (ता. कारंजा लाड) आणि डव्हा (ता. मालेगाव) याठिकाणी वीज अवरोधक यंत्र स्थापित करण्यात आले होते. मात्र, मुदतबाह्य झालेले चारही ठिकाणचे हे यंत्र आजरोजी पूर्णत: निकामी ठरले आहे. असे असताना पर्यायी व्यवस्था करण्याकडेही प्रशासनाने लक्ष पुरविले नाही. यामुळे विज पडून जिवीतहानी होण्याची शक्यता बळावली आहे.
आकाशातील विजांमुळे दोन वर्षात झालेली हानी!२९ मे २०१७ - वीज अंगावर पडून मोरगव्हाणवाडी (ता.रिसोड) येथील दोन मजुरांचा मृत्यू ३१ मे २०१७ - कुरळा (ता. मालेगाव) येथील वृद्धाचा मृत्यू. ३ जून २०१७ - कळंबा बोडखे (ता. मंगरूळपीर) येथील महिला गंभीर जखमी. ११ आॅक्टोबर २०१७ - साळंबी (ता.मंगरूळपीर) येथे १६ जनावरे मृत्यूमुखी.११ एप्रिल २०१८ - विळेगाव (ता.मानोरा), वारा जहाँ (ता.वाशिम) येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू.