लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : आधार कार्ड नोंदणीसाठी अत्यल्प केंद्र असल्याने नोंदणीसाठी रिसोड येथील पोस्ट आॅफिससमोर सकाळपासूनच रांगा लागत आहेत. दरम्यान, यासंदर्भात भाजपाच्या पदाधिकाºयांनी निवासी उपजिल्हाधिकाºयांशी ३१ जानेवारीला चर्चा केली असून, त्यानुसार येथे दोन ते तीन अतिरिक्त केंद्र मिळण्याची चिन्हे आहेत.रिसोड येथे एकाच ठिकाणी पोस्ट आॅफिस कार्यालयात आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीचे केंद्र सुरू आहे. येथे सकाळी ६ वाजेपासूनच नविन आधार कार्ड किंवा अधार कार्ड दुरूस्तीकरीता रांगा लागत आहे. रिसोड पोस्ट विभागामध्ये दररोज फक्त १५ व्यक्तीचेच आधार कार्ड संदर्भात कामकाज करण्यात येते. याबाबत या कार्यालयासमोर सुचना फलकही लावण्यात आले. विविध शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार नोंदणीसाठी रिसोड येथे सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागत आहेत. ही गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी ३१ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी चर्चा केली. आधार कार्ड केंद्र वाढवून देण्याची मागणी यावेळी ठाकूर यांनी हिंगे यांच्याकडे केली. केवळ एकच केंद्र असल्यामुळे नागरिकांची आधार नोंदणीबाबत कशी गैरसोय होत आहे, ही बाब यावेळी निदर्शनात आणून दिली. याबाबत संबंधितांकडून योग्य ती माहिती घेऊन रिसोड तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीदेखील आधार नोंदणी केंद्राची संख्या वाढवून देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही हिंगे यांनी ठाकूर यांना दिली.
रिसोड येथे आधारकार्डसाठी रांगा; नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 6:13 PM