श्री चरखा परिवार व गायत्री सत्संग मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे आचार्य विजय प्रकाश दायमा यांच्या वाणीतून स्थानिक ओंकारेश्वर धाम चरखा यांच्या निवासस्थानी गुरुद्वारा रोड येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ झाला. यात भाविकांचे प्रबोधन करताना आचार्य दायमा म्हणाले, मनुष्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे जरुरी आहे. जीवनात पाणी व वाणीचा सदुपयोग करावा, असे सांगतानाच भागवत कथा श्रवण केल्याने काम, क्रोध, अहंकार नष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक श्री ओंकारेश्वर धाम येथे आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाचे मुख्य यजमान ज्योती चरखा, पप्पूभाऊ चरखा असून त्यांनी सर्वप्रथम आचार्य दायमा यांचे पूजन केले. दायमा पुढे म्हणाले, आज ठिकठिकाणी भागवत सप्ताहांचे आयोजन केले जात आहे. मात्र मनुष्याला मानसिक शांती मिळत नाही. याचे कारण मनुष्य हा भागवत कथा ऐकतो; मात्र त्याचे चिंतन, मनन, अनुसरण करीत नाही. आईवडिलांची सेवा केल्याने ईश्वराची प्राप्ती होते. मनुष्य प्राप्तीसाठी संयम, सदाचार, सेवा व स्नेह हे चार गुण अंगी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
------
दरदिवशी १२ ते ५ दरम्यान कथा वाचन
श्रीमत् भागवत कथा दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान होत आहे. शासकीय नियमांचे पालन करीत भागवत कथा वाचन होत आहे. भाविक - भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करून कथा श्रवण करण्याचे आवाहन चरखा परिवार व आनंद दायमा, सत्यनारायण अग्रवाल, कचरूलाल भांगडिया, नीलेश सोमानी आदींनी केले आहे.