लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : समाजातील अनिष्ट चालिरीती, परंपरांना मोडीत काढून परिवर्तनशिल विचारांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची सद्या नितांत गरज निर्माण झाली आहे. ही ताकद केवळ साहित्यीकांच्या लेखनीत आहे. त्यासाठी समाजातील साहित्यीकांच्या सहकार्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यापूर्वी तीन युवा साहित्य संमेलन घेऊन आता जानेवारीत वाशिममध्ये हे संमेलन आयोजित करण्याची तयारी करणारे तथा त्यानुषंगाने शनिवारी वाशिममध्ये आलेले युवा साहित्यीक संतोष इंगळे यांच्याशी साधलेला संवाद...
आतापर्यंतच्या युवा साहित्य संमेलनांविषयी काय सांगाल?
युवा साहित्यीकांची तळमळ, त्यांचा आवाज तळागाळापर्यंत पोहचावा, या उद्देशाने अकोला शहरात १५ जानेवारी २०१७ रोजी पहिले युवा साहित्य संमेलन आयोजित केले होते. दर्यापूर (जि.अमरावती) येथे १२ जानेवारी २०१८ ला दुसरे; तर खामगाव (जि.बुलडाणा) येथे २० जानेवारी २०१९ ला तिसरे युवा साहित्य संमेलन पार पडले. तीनही संमेलनास राज्यातील प्रख्यात विचारवंतांना बोलावून त्यांची आणि स्थानिक युवा साहित्यीकांची वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक व परिवर्तनाची नाळ जोडून देण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे. आगामी युवा साहित्य संमेलन वाशिममध्ये प्रा. हरीभाऊ क्षीरसागर यांच्या सहकार्याने येत्या जानेवारीत घेण्याचे नियोजन केले जात आहे.
युवा साहित्य संमेलन घेण्यासाठी निधीची तरतूद कशी केली जाते ?
यापूर्वी झालेल्या तीनही साहित्य संमेलनांसाठी कुठलाही शासकीय निधी घेतलेला नाही. समाजातील काही दानशूर तथा साहित्याची जाण असणाºयांच्या सहकार्यानेच ही संमेलने यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे संमेलनांमध्ये विचार व्यक्त करण्यासाठी आजवर बोलाविण्यात आलेल्या वक्त्यांनाही कुठलेच मानधन दिले नाही.
तसेही जिथे ह्रदयापासून ह्रदयापर्यंतच्या माणसाला मान दिला जातो, तिथे धनाची अपेक्षा कशासाठी?
साहित्य संमेलने आयोजित करण्यातून तुमचा काय लाभ? समाजात परिवर्तनाच्या विचारांची प्रबोधनातून पेरणी करायची असेल तर त्यातून कुठला लाभ पदरात पडणार, याची अपेक्षा करणेच मूळात चुकीचे आहे. मी अत्यंत सर्वसामान्य कुटूंबातील असून मी आजवर आयोजित केलेल्या साहित्य संमेलनांच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तनात्मक साहित्यसेवेच्या कार्याला वाहून घेतलेल्या या क्षेत्रातील मातब्बरांचा मिळणारा आशिर्वादच आपणास स्वर्गसुखाची अनुभूती करून देतो.