- सुनील काकडे वाशिम : केंद्र शासनाच्या पशूसंवर्धन विभाग संचालकांनी परिपत्रकाव्दारे दिलेल्या निर्देशानुसार २० व्या पशुगणनेला जानेवारी २०१९ पासून सुरूवात करण्यात आली. ठरल्यानुसार मार्च २०१९ अखेर पशुगणना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते शक्य न झाल्याने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याऊपरही विविध स्वरूपातील अडचणींमुळे मुदतीनंतरही वाशिम जिल्ह्यातील पशुगणनेचे काम पूर्ण झाले नसून ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी ३ मे रोजी दिली.प्रत्येक पाच वर्षानंतर आॅक्टोबर महिण्यात संदर्भदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पशुगणनेला सुरूवात केली जाते. त्यानुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये करण्यात आली होती. या पशुगणनेनुसार वाशिम जिल्ह्यात ३ लाख १७ हजार जनावरांची नोंद झाली होती. दरम्यान, २० वी पशुगणना पाच वर्षानंतर अर्थात आॅक्टोबर २०१७ पासून होेणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्षात मात्र पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्षच पुरविले नाही. यामुळे पशुगणनेची प्रक्रिया राबविण्यास प्रचंड विलंब झाला.अखेर जानेवारी २०१९ मध्ये त्यास मुहूर्त सापडून पशुगणनेला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील गावांमध्ये पशुगणना करण्यासाठी ग्रामीण भागात ५४ आणि शहरी भागात ८ असे एकूण ६२ प्रगणक नेमण्यात आले. संबंधितांना दोनवेळा पशुगणनेसंबंधीचे प्रशिक्षणही देण्यात आले. तसेच पशुगणनेची माहिती दैनंदिन ‘आॅनलाईन’ पाठविण्यासाठी ‘टॅब’ पुरविण्यात आले. मात्र, संपूर्ण भारतातील जिल्ह्यांमधून प्राप्त होणारी माहिती साठविण्याकरिता दिल्ली येथेच मुख्य ‘सर्व्हर’ असल्याने ते वारंवार ‘डाऊन’ राहणे, ग्रामीण भागातील दुर्गम, अतीदुर्गम भागात ‘इंटरनेट’ची गती कमी असणे यासह अन्य स्वरूपातील तांत्रीक अडचणी उद्भवत असल्याने पशुगणनेच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. पर्यायाने ३० एप्रिल ही अंतीम मुदत असताना ६२ प्रगणकांकडून वाशिम जिल्ह्यातील २ लाख १९ हजार घरांचाच सर्वे आतापर्यंत पूर्ण झाला असून अद्याप अनेक घरांना भेटी देवून त्याठिकाणी नेमके पशुधन किती, याची माहिती गोळा करण्याचे काम अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे २० व्या पशुगणनेनुसार वाशिम जिल्ह्यात नेमके पशुधन किती, याची आकडेवारी येण्यास जून महिना उजाडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात ६२ प्रगणकांमार्फत २० व्या पशुगणनेचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख १९ हजार घरांना भेटी देवून पशुधनाची माहिती गोळा करण्यात आलेली आहे. सदर माहिती दिल्ली येथील मुख्य ‘सर्व्हर’मध्ये साठविण्याकरिता पाठविण्यात येत असून अंतीम आकडेवारी हाती यायला आणखी बराच अवधी लागणार आहे.- डॉ. गणेश पवारपशुधन विकास अधिकारी, वाशिम