वाशिम : आज अनेकांमध्ये लोभप्रवृत्ती वाढत असल्याचे दिसून येते. एकवेळा लोभ आला की क्रोध, द्वेष, माया या प्रवृत्ती माणसात वाढतात आणि त्यातूनच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. लोभप्रवृत्ती ही सर्व विकृतीची जनक आहे, असे प्रतिपादन मुनीश्री सुप्रभसागरजी महाराज यांनी १८ सप्टेंबरला केले.स्थानिक महावीर भवन येथे चातुर्मास समिती, सकल जैन समाजाच्यावतीने समयसारोपासक साधना संस्कार शिबिर सुरू आहे. १८ सप्टेंबरला ‘उत्तम सोच’ या विषयावर मुनीश्री सुप्रभसागरजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. मंचावर मुनीश्री आराध्यसागरजी, मुनीश्री प्रणतसागरजी महाराज उपस्थित होते. यावेळी मुनीश्री सुप्रभसागरजी म्हणाले की, आज अनेक जण आपले शरीर सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न करतात. युवा वयात आपण कितीही चकाकलो तरी प्रत्येक जण भविष्यात म्हातारा होणार आहे. समाजातील वयोवृध्दांना बघुन आजच आपण जागृत होणे जरुरी आहे. आपण दुसºयाला नाव ठेवण्यात वेळ व्यर्थ गमावत आहोत. महिला भगिनीही घरात सर्व वस्तु असतांनाही जुन्या वस्तुमध्ये त्यांचे मन असते. घरातील ज्या वस्तु कामाच्या नाहीत त्या घरात पडून सडून जातात. मात्र त्या वस्तु आपण एखाद्या गरजवंतांना देत नाही. याचे सर्व कारण म्हणजे लोभप्रवृत्ती आहे. माणूस पोटासाठी कमी पेटीसाठी जास्त जगत आहे. पेटीसाठी तो धावत आहे. या सर्व गोष्टी व्यर्थ असून लोभप्रवृत्ती पासून आपण साधव राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. शिबिरात महिला व पुरुषांची उपस्थिती होती.
लोभप्रवृत्ती ही सर्व विकृतीची जनक - मुनीश्री सुप्रभसागरजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 4:36 PM