- शिखरचंद बागरेचालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपच्या नेत्रहीन मुलांच्या राखी उद्योग यावर्षी पहिल्यांदा ‘लॉकडाऊन’ झाला. याशिवाय अन्य ठिकाणी न जाता यावर्षी गावातच रक्षाबंधन साजरी करण्याची वेळ आली. मागील चार महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने दहशत निर्माण केली असून, सर्व व्यवहार प्रभावित झालेले आहेत. परिणामी याची झळ सर्व स्तरातील लोकांना सोसावी लागत आहे. केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपमधील पंधरा नेत्रहीन मुले-मुली स्वत: संगीत कलेत निपून होऊन या संगीतकलेच्या माध्यमाने आपली उपजीविका चालवितात. साधारणत: सात, आठ वर्षांपासून राखी पौर्णिमेदरम्यान सुंदर व आकर्षक राख्यांची निर्मिती करून ते डोळसांनाही लाजवतात. त्यांच्या सुंदर, स्वस्त, आकर्षक राख्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये अशा विविध ठिकाणी ही मुले स्टॉल लावून राख्यांची विक्री करतात. स्वकष्टाने मिळविलेल्या उत्पन्नातून ही मुले आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करतात. दरवर्षी राखी पौर्णिमा येण्याची आतुरतेने वाट पाहणारी ही मुले दोन महिन्यापूर्वीपासूनच राख्या बनवायला सुरवात करतात. यावर्षी सर्वच राख्यांच्या व्यवसायावरही गडातंर चेतन सेवांकूर ग्रूपलाही फटका बसला. कोरोनामुळे राख्यांची आकर्षक निर्मिती तसेच रक्षा बंधन सर्वत्र साजरा करण्याची चेतन सेवांकूर ग्रूपची परंपरा यावर्षी प्रथमच खंडीत झाली आहे. घरगुती पद्धतीने यावर्षी रक्षा बंधन साजरा केला जाणार आहे. कोरोनामुळे राखी उद्योग लॉकडाऊन झाला; शिवाय चेतन सेवांकूर ग्रूपमधील सदस्यांच्या आनंदावरही विरजन पडले.
कोरोनामुळे नेत्रहिनांचा राखी उद्योग ‘लॉकडाऊन’; पहिल्यांदाच परंपरा खंडीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 4:29 PM