- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोना विषाणूच्या संकटाने भारतातही विशेषत: महाराष्ट्रात हाहाकार माजविला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात आहे. गत दीड महिन्यांपासून संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या काळात सांस्कृतिक चळवळ थंडावली की वृद्धींगत झाली, लेखक आणि कवींचे लिखान थांबले की पुरेशी सवड मिळाल्याने लिखानाला गती मिळाली, आदींबाबत ज्येष्ठ साहित्यीक बाबाराव मुसळे यांच्याशी साधलेला हा संवाद...
सध्या उद्भवलेल्या स्थितीबाबत आपण काय सांगाल?आपला भारत देश किंवा महाराष्ट्रच नव्हे; तर जगातील २०० पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. हा विषाणू मानवनिर्मित की निसर्गनिर्मित हा वाद सद्या जोरात सुरू आहे; पण वास्तव स्थिती ही, की तो महामारीच्या स्वरूपात आपल्यासमोर उभा ठाकला आहे आणि त्याला समर्थपणे तोंड देणे हाच एकमेव उपाय आहे. प्रत्येकाने शक्यतोवर घरात राहणे, ही त्यावरची मजबूत अशी तोड आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने स्वत:ला सुरक्षित ठेवावे. त्यातच इतरांचीही सुरक्षा सामावलेली आहे.
‘लॉकडाऊन’मुळे सांस्कृतिक चळवळ थांबली का ?खरे म्हणजे प्रत्येकाने काळाबरोबर चालणे, हा प्रकृतीधर्म आहे. त्यामुळे कुठलीच गोष्ट काळामागे पडत नाही. ती चालत राहते. कारण थांबला तो संपला. सांस्कृतिक चळवळ देखील अशीच आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सभा-संमेलने, मेळावे, परिसंवाद अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असेल, तरी संस्कृतिक जवळ थांबलेली नाही. फक्त तिचे माध्यम बदलले आहे. फेसबुक, व्हाट्सअॅपवर काही सांस्कृतिक, साहित्यिक गट मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. यामाध्यमातून कवींना, साहित्यिकांना निमंत्रित करून कविसंमेलन, चर्चा, अनुभवकथन यासारखे प्रयोग सातत्याने करत आहेत. त्यामुळे चळवळ थांबली, असे म्हणता येणार नाही.
लेखन प्रक्रियेविषयी काही...लेखन ही दोन अवस्थेतील प्रक्रिया असते. एखाद्या विषयामुळे मनातल्या मनात ती सुरू होते. तिच्या संदर्भातील जे काही विचार असतील ते परिपक्व झाले की त्या कलाकृतीचे प्रकटीकरण सुरू होते. मग ते पेनाच्या माध्यमातून कागदावर उतरविणे असो किंवा अलीकडे डिजिटल माध्यमातून स्क्रीनवर उमटणे असो; मात्र त्यासाठी माणसाला निवांतपणा हवा असतो. आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक लेखक, कवी, कलावंत हा सक्तीने घरातच बंदिस्त आहे. त्यामुळे त्यास फार मोठी संधी चालून आलेली आहे. बंदीच्या काळात लेखकांची सृजनशीलता वाढीस लागत आहे. त्यातूनच अनेक कलाकृती जन्मास येत आहेत. मी सद्या एक कादंबरी, एक प्रवासवर्णन आणि माझे आत्मचरित्रात्मक लेख असे तिहेरी लेखन चालू ठेवले आहे. सारांशाने लेखन प्रक्रिया ही कधीच थांबत नसते. सद्या तर त्यासाठी पुरक आणि पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.