वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ९ ते १५ मे दरम्यान लागू केलेल्या कडक निर्बंधांना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी एका आदेशान्वये २० मे पर्यंत मुदतवाढ दिली. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून किराणा, डेअरी, भाजीपाला, फळविक्रेते, पिठाची गिरणी व रेशन दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत सूट दिली. उर्वरीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद राहणार असून, त्यांना पार्सल सुविधा पुरविता येणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध २० मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहणार आहे. मात्र, या कालावधीत किराणा दुकाने, भाजीपाला व फळेविक्री, डेअरी, पिठाची गिरणी, रेशन दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहे. भाजीपाला दुकाने व फळे विक्रेत्यांसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकेंद्रित स्वरुपात ठिकाणे निश्चित करून द्यावीत व याठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट आॅफिस ही कार्यालये नागरिकांसाठी अत्यावश्यक कामांसाठी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. या व्यतिरिक्त सर्व दुकाने तसेच खाद्य पदार्थांची सर्व दुकाने (मांस, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन शहरी भागात संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामीण भागात संबंधित गट विकास अधिकारी यांच्या स्तरावरून करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या. दरम्यान, १५ मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजीपाला, डेअरी, विविध प्रकारच्या फळांच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा सुरू राहणार
हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ, शिवभोजन थाळी केंद्र येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास संबंधित आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पोलीस स्टेशन व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. दुध संकलन केंद्र व घरपोच दुध वितरणास सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा राहील.ई- कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू !
ई- कॉमर्समार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरू राहतील. स्थानिक दुकानदार, हॉटेलामार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जाताना बिल व संबंधित दुकानदारांमार्फत देण्यात येणारे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था करतील. या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.कृषी सेवा केंद्र, बाजार समित्या बंदच
सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणा-या साहित्याच्या उत्पादनाच्या निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, सदर दुकानांची केवळ घरपोच सेवा सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत सुरु राहील. कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि, शेतक-यांना आवश्यक त्या वस्तूचा पुरवठा घरापर्यंत, तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहील. या प्रक्रियेचे नियोजन व संनियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्यावर सोपविली आहे.