लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात रविवार, ९ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून पुढील सात दिवसांसाठी कडक निर्बंध लागू झाले असून, पहिल्याच दिवशी वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लागू आहे. तथापि, कोरोनाचा कहर सुरूच असल्याने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात ९ मे ते १५ मे यादरम्यान कडक निर्बंधांसंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ७ मे रोजी आदेश जारी केले. कडक निर्बंधांबाबत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही तसेच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहेत. कडक निर्बंधांची अंमलबजावणी रविवार, ९ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून झाली असून, पहिल्याच दिवशी वाशिमसह रिसोड, कारंजा, मालेगाव, शिरपूर, मंगरूळपीर, मानोरा, अनसिंग, शेलुबाजार, कामरगाव, आसेगाव, केनवड यासह प्रमुख ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, सात दिवस कडक निर्बंध असल्याने रविवारी सकाळी ७ ते ११ या दरम्यान बाजारपेठ, भाजीबाजार, पेट्रोल पंप, एटीएम आदी ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी दिसून आली. शहरातील सर्वच पेट्रोल पंप परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याने पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना एक ते दोन रांगांत यावे लागले. सात दिवस घरातच राहावे लागणार असल्याची कल्पना असूनही पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचे पाहून आश्चर्यही व्यक्त केले जात होते. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी कडक निर्बंधांदरम्यान सात दिवस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.
Lockdown : कडक निर्बंधांना वाशिमकरांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:20 AM