- सुनील काकडे वाशिम : लोकसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रमुख राजकीय पक्षातील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले आहे. ठराविक गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही पक्षात विशेष सन्मान मिळत नसल्याच्या कारणावरून अंतर्गत वाद धुमसत असून त्याचा मोठा फटका थेट उमेदवारांना बसण्याचे संकेत वर्तविले जात आहेत.शिवसेनेच्या विद्यमान उमेदवार भावना गवळी यांच्या पाठीशी स्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा जत्था असण्यासोबतच मित्रपक्ष असलेल्या भाजपामधील स्थानिक नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही पाठबळ असायला हवे होते. प्रत्यक्षात मात्र यंदाची परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे. कारंजा-मानोरा आणि वाशिम-मंगरूळपीर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील काही नाराज पदाधिकाऱ्यांनी छुप्या पद्धतीने आघाडी उघडली आहे. हा विरोधी गट तुलनेने प्रभावी असून भावना गवळींची हक्काची मते घटविण्यात मोठी भुमिका पार पाडू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजपा या मित्रपक्षातील स्थानिक नेतेमंडळी ‘आम्ही सोबतच’च्या वल्गना करित असले तरी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भावना गवळींनाही भाजपातील बहुतांश प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यात अद्याप यश आलेले नाही.मंगरूळपीर येथे शनिवार, ६ एप्रिल रोजी शिवसेनेच्या एका पदाधिकाºयाने ‘चौकीदारही चोर है’ची घोषणा दिल्यानंतर भाजपाकडून त्यास मिळालेल्या तिखट प्रतिसादावरून ही बाब स्पष्टपणे अधोरेखीत झाली त्यामुळे निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली असताना स्वपक्षासोबतच मित्रपक्षात पसरलेली ही नाराजी दूर करण्याचे आव्हान भावना गवळी यांचे समोर आहे.
काँग्रेसमध्येही रंगतेय मानापमान नाट्य!वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरलेले माणिकराव ठाकरे यांना विजयी करण्यासाठी स्वपक्षासोबतच प्रमुख मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारी प्रयत्नरत दिसत असले तरी गटातटात विखुरलेल्या काही स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पक्षात सन्मान मिळत नसल्याच्या कारणावरून नाराजीचा सूर उमटत आहे. राष्ट्रवादीतही अनेक गट पडले असून त्यांना एकत्र आणण्यात ठाकरेंना सद्यातरी यश मिळालेले नाही. यामुळे उघडपणे नव्हे; परंतु छुप्या पद्धतीने सुरू असलेला हा विरोध ठाकरे यांना अडचणीचा ठरू शकतो असा अंदाज राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
पवारांसह आडे आणि येडे यांच्याकडेही मतदारांचे लक्ष!लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमाविण्यासाठी उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रविण पवार, बंडखोर पी.बी. आडे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वैशाली येडे या तीन उमेदवारांचा प्रचारही सद्या तेजीत असून ते नेमकी कोणाची मते खाणार याकडे वाशिम व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.