वाशिम - लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दिव्यांग मतदारांना सुविधा उपलब्ध करतानाच या प्रक्रियेत रणरणत्या उन्हात उभे राहणाऱ्या मतदार मातांच्या चिमुकल्यांना पाळणाघराचा मोठा आधार झाला आहे. मोहरी येथे या पाळणाघराचा आधार अनेक महिलांनी घेत मतदान केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास फायदा झाल्याचेही स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रियेला ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. मतदानादरम्यान उन्हात ताटकळत उभे राहणाऱ्या मतदारांना त्रास होऊ नये, मतदान यादी पाहताना अडचणी येऊ नये म्हणून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आदि सुविधा असतानाच महिला मतदारांच्या मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघराचीही सुविधा दिली. महिला मतदारांना या पाळणाघरात मुले ठेवून मतदान करणे सोपे झाले. या पाळणाघरात आशा सेविकांनी मुले सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे महिलांच्या मतांचा टक्का वाढण्यासही मदत झाल्याचे दिसून आले.
लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत.
17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.