लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही मते या लोकसभा निवडणुकीत मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो, त्यामुळे युतीसमोर ही मते कायम राखण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच ही निवडणूक भाजप-सेनेच्या मंत्री, आमदार तसेच गत विधानसभेतील पराभूत उमेदवारांची परीक्षा ठरणार आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या मतांचे विभाजन झाले. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या मतदारांची खरी ताकद अधोरेखीत झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीची पाच लाख ३१ हजार २०२ मते हक्काची आहेत. त्यात सर्वाधिक दोन लाख ७३ हजार २९३ मते एकट्या भाजपाची आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला दोन लाख ५७ हजार ९०९ मते आली होती. यावरून या मतदारसंघात भाजपला मानणारा मतदारवर्ग ५१.४४ टक्के तर शिवसेनेला मानणारा ४८.५५ टक्के मतदारवर्ग आहे. विशेष म्हणजे, सहा मतदारसंघात ४८ टक्के मते सेनेला मिळाली, तरी त्यांचा एकमेव उमेदवार विजयी झाला. या उलट अवघी ३ टक्के जास्त (५१ टक्के) मते मिळवून भाजपचे एक-दोन नव्हे, तर चार आमदार निवडून आले. ११ एप्रिलला यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट लढत आहे. दोन्ही पक्षांना बंडखोराची भीती आहे; मात्र या मतदारसंघात युतीला मानणारे पाच लाख ३१ हजार २०२ मतदार आहेत. एवढी मते कायम राखण्यात भाजप-सेनेच्या नेत्यांनी यश मिळविले तरी सेनेचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. या मतदारसंघात भाजपा व शिवसेनेचे प्रत्येकी एक राज्यमंत्री, भाजपचे आणखी तीन आमदार, एक विधान परिषद सदस्य अशी ताकद आहे. या सर्वांनी एकजुटीने व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे झोकून देत काम केल्यास लोकसभेत युतीचा विजय दूर नाही. वास्तविक सहा पैकी पाच आमदार युतीचे असल्याने लोकसभेच्या उमेदवाराला २०१४ च्या तुलनेत (९३ हजार) यावेळी मतांची आघाडी किमान दुप्पट होणे अपेक्षित आहे. कारण यावेळी पुसदमध्ये विधान परिषद सदस्याच्या रुपाने भाजपाची अतिरिक्त ताकद वाढली आहे. उच्चशिक्षित व राजकीय वारसा असलेल्या या नेत्याच्या झोळीत भाजपाने आपल्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारुन थेट विधान परिषद सदस्यपद टाकले. त्या मोबदल्यात विधान परिषद सदस्य युतीला आता पुसद विधानसभा मतदारसंघातून किती ताकद देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. यावेळी या सदस्याच्या ‘परफॉर्मन्स’वर भाजपाची खास नजर राहणार आहे. गटबाजीमुळे ‘मातोश्री’ची नजर दिग्रस मतदार संघावरही राहणार आहे. तेथून सेनेला किती लिड मिळतो, हे महत्त्वाचे ठरते.
Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिममध्ये युतीसमोर मते टिकविण्याचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 1:02 PM