लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानच्या रस्त्यावर पाणी व चिखल असल्याने ये-जा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत असल्यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच, सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अडोळी गावात मुलभूत सुविधांचा बोजवारा उडत आहे. गावाचा विकास साधण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार निधी पुरविला जातो. तसेच अन्य शासकीय योजनांतून निधी मिळतो. परंतू, अडोळी येथील समस्यांवर नजर टाकली असता, शासनाचा निधी गावात पोहचतो की नाही, असा प्रश्न गावकºयांनी उपस्थित केला. गावातील मुख्य रस्त्यावर चिखल व पाणी साचले आहे. रस्त्यावरून चालायचे झाल्यास मोठी कसरत करावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानचा हा रस्ता गावाचा प्रमुख असुन मुलांना शाळेत जाण्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यासंदर्भात लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ठाणेदार भारद्वाज यांनी अडोळी गाव गाठून सरपंच व ग्रामसेवकांना रस्ता कामासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार काम सुरु झाले आहे, अशी माहिती निवेदनकर्ते तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी दिली.
लोकमत इफेक्ट : अडोळी येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 1:53 PM