इंझोरी : पशुधन पर्यवेक्षकांकडून परिसरातील पशू लसीकरणासाठी खासगी व्यक्तींचा वापर करण्यात आला. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून पशू संवर्धन विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर जिल्हा पशूसंवर्धन अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत पशुधन पर्यवेक्षकांची कानउघाडणी केल्यानंतर बुधवारपासून पशुधन पर्यवेक्षकांनी स्वत: उपस्थित राहून पशुंवर लसीकरणास सुरुवात केली आहे. या अंतर्गत एकाच दिवसांत ५०४ गुरांवर लसीकरण करण्यात आले आहे.
इंझोरी परिसरात गुरांवर घटसर्प या भीषण आजाराची लागण होत आहे. वातावरणातील बदलामुळे हा आजार पसरत आहे. पण, या परिसरातील गुरांची निगा राखण्यासाठी पशू वैद्यकीय दवाखानाच नाही. तब्बल १४ गावांसाठी असलेला दापुरा येथील पशू दवाखाना ९ वर्षांपूर्वी बंद करून, कोंडोली अंतर्गत या परिसराची जबाबदारी सोपविण्यात आली. तथापि, कोंडोली येथील पशुधन पर्यवेक्षकांची नियमीत फेरी या परिसरात होणे शक्य होत नाही. त्यातच दोन वर्षांपासून या परिसरात पशू संवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून गुरांची तपासणीच करण्यात आली नाही. आता पावसाळ्याच्या दिवसांत गुरांवर घटसर्प आजाराचा प्रादूर्भाव होत असताना पशू पालकांत संतापाची लाट उसळली होती. या पृष्ठभूमीवर लोकमतने वृत्त प्रकाशित करून पशूसंवर्धन विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखलही घेण्यात आली; पण पशूधन पर्यवेक्षकांनी स्वत: उपस्थिती न लावता खासगी व्यक्तींकडून गुरांचे लसीकरण करून घेतले. लोकमतने या प्रकाराचाही उहापोह केला. त्यानंतर, अखेर जिल्हा पशूसंवर्धन अधिकाऱ्यांनी स्वत: या परिसराला भेट देऊन पशूधन पर्यवेक्षकांची कानउघाडणी करीत त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली. त्यानंतर बुधवारपासून पशूधन पर्यवेक्षकांनी इंझोरी परिसरात गुरांवर स्वत:च लसीकरणास सुरुवात केली. या अंतर्गत बुधवारी एकाच दिवसात ५०४ गुरांना विविध आजाराच्या लसी देण्यात आल्या आहेत.