संतोष वानखडे
वाशिम : ‘घरकुल योजना’ प्रशासकीय दिरंगाईत अडकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने 21 जुलैच्या अंकात प्रकाशित करताच जिल्हास्तरावरून तातडीने सुत्रे हलली आणि 550 घरकुलांना मंजूरी दिली. मंजूर असलेल्या सर्व घरकुलांच्या कामांना सुरूवात करण्याचे निर्देश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, दिव्यांग, विधवा, परितक्त्या आदी प्रवर्गातील बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेतून घरकुलाचा लाभ दिला जातो.
सन 2017-18 या वर्षात रमाई आवास योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्याला तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. यामध्ये वाशिम तालुक्यात 553, मालेगाव तालुका 565, रिसोड तालुका 606, मंगरूळपीर तालुका 522, मानोरा तालुका 303 व कारंजा तालुक्यातील 451 घरकुलांचा समावेश आहे. मे, जून 2017 या महिन्यात पंचायत समिती स्तरावर पात्र लाभार्थींकडून यासाठी अर्ज मागविले होते. प्राप्त अर्जांची छानणी करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरच चमूही नियुक्त केली होती. छानणीअंती त्या-त्या ग्रामपंचायतमधील पात्र लाभार्थींची यादी मंजूरीसाठी ग्रामसभेत ठेवण्यात आली. ग्रामसभेने मंजूरी दिल्यानंतर सदर यादी पंचायत समितीमार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविण्यात आली. सन 2017-18 या वर्षातील ही प्रक्रिया मार्च 2018 पर्यंतही पूर्ण झाली नव्हती. सन 2018-19 या वर्षातील तीन महिने झाल्यानंतरही परिपूर्ण यादी पंचायत समिती स्तरावरून प्राप्त होत नसल्याचे पाहून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सहाही पंचायत समिती प्रशासनाला घरकुलाच्या याद्या तातडीने सादर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या इशाऱ्यानंतर रिसोड तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मालेगाव व वाशिम तालुक्यातून एका महिन्यापूर्वी पात्र लाभार्थींची यादी प्राप्त झाली. या यादीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्यात आला. मात्र, रिसोड तालुक्यातील 606 घरकुलांचा प्रश्न दीर्घ प्रतिक्षेनंतरही निकाली निघाला नव्हता. याप्रकरणी 606 घरकुलं प्रशासकीय दिरंगाईत अडकल्याची बाब ‘लोकमत’ने 21 जुलै रोजी चव्हाट्यावर आणताच, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने गटविकास अधिकाऱ्यांना सूचना करत सर्व याद्या तातडीने सादर करण्याचे बजावले. या याद्या प्राप्त होताच जवळपास 550 घरकुलांना मंजुरी दिली असून, घरकुलांच्या कामांना सुरूवात करण्याच्या सूचनाही दिल्या, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक प्रमोद कापडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
घरकुल योजनेप्रकरणी पंचायत समिती प्रशासनाने दिरंगाई करू नये, अशा सूचना दिलेल्या आहेत. मानोरा, वाशिम, कारंजा, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यात मंजूरी मिळालेल्या घरकुलांच्या कामांना सुरूवात झाली. रिसोड तालुक्यातील याद्या प्राप्त होण्यास विलंब झाला. आता 550 पेक्षा अधिक घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून, घरकुलांची कामे सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.-प्रमोद कापडेप्रभारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशिम.