विजेच्या वापरानुसार ग्राहकांना वीजदेयकाची आकारणी होणे आवश्यक आहे. यासाठी मीटर रीडिंग अनिवार्य असून, महावितरणतर्फे एजन्सीची नियुक्तीदेखील केली आहे. मात्र, एजन्सीकडून नियमित मीटर रीडिंग घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके मिळत आहेत. काही ग्राहकांना अंदाजे देयक आकारणी होत असल्याने तीन, चार महिन्यांनंतर ३० ते ४० हजारांपर्यंत वीजदेयक दिले जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. वीज देयकाचा भरणा वेळेवर न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणारे महावितरण, मीटर रीडिंग नियमित न घेणाऱ्या एजन्सीविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नसल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहे. मीटर रीडिंग नियमित न घेणाऱ्या एजन्सीविरुद्ध महावितरण काय कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
कोट
संबंधित एजन्सीने मीटर रीडिंग नियमित घ्यावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. मीटर रीडिंग घेतले नाही तर ‘अॅव्हरेज’नुसार देयक आकारणी केली जाते. मीटर रीडिंग नियमित होत नसल्यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार केल्यास संबंधित एजन्सीविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते.
- आर. जे. तायडे
कार्यकारी अभियंता,
महावितरण, वाशिम