सुनील काकडेवाशिम, दि. २२: माती परिक्षण करून जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकर्यांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यात कृषी विभागाकडून तसा प्रयत्न होताना दिसत नाही. जिल्हा निर्मितीच्या १८ वर्षानंतर येथे मृद सर्वेक्षण प्रयोगशाळा मंजूर झाली; पण भाड्याच्या जागेत सुरू होणार्या या प्रयोगशाळेचे कामही संथगतीने सुरू असल्याची बाब समोर आली आहे.पारंपारिक व तीच ती पिके वारंवार घेतल्याने जमिनीची सुपिकता नष्ट होते. या पृष्ठभूमीवर जिल्ह्याच्या कृषी विभागाने शेतकर्यांच्या शेतामधील मातीचे परीक्षण करून जमिनीची मृद आरोग्य पत्रिका त्यांना द्यावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार, वाशिम जिल्ह्याला मृद सर्वेक्षण, मृद चाचणी प्रयोगशाळा मंजूर झाली. यासाठी लागणारे साहित्य देखील कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र, भाड्याने घे तलेल्या एका इमारतीत सुरू होणारी ही प्रयोगशाळा या ना त्या कारणांनी अद्याप सुरूच होवू शकली नाही. परिणामी, आजही वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांना माती परिक्षणासाठी अकोला येथेच जावे लागत आहे. दरम्यान, ज्या इमारतीत ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे, त्याठिकाणची पाहणी केली असता, जिल्हा मृद सर्वेक्षण, मृद चाचणी कार्यालय असे फलक लावलेला दरवाजा कुलूपबंद आढळून आला. एका खिडकीतून आत डोकावून तपासणी केली असता, चार खुच्र्या आणि खोकाबंद साहित्य दिसून आले. यापलिकडे भाड्याने घेतल्या जाणार्या या इमारतीत काहीच आढळले नाही. या गंभीर बाबीकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकार्यांनी लक्ष पुरवून मृद सर्वेक्षण प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करण्यासंबंधी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्यांमधून जोर धरत आहे.
माती परिक्षणाला ‘खो’; शेतकरी अनभिज्ञ!
By admin | Published: August 23, 2016 12:03 AM