- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, जुलै महिन्यात दैनंदिन सरासरी ८ रुग्ण आढळून आले. मात्र, जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू असल्याने या निर्बंधामधून सूट केव्हा मिळणार, याकडे व्यापाऱ्यांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८,९३४ होती. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारावर रुग्ण आढळून आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत आहे. जुलै महिन्यात तर निचांकी संख्येत रुग्ण आढळून आले. ३१ दिवसांत २४६ अर्थात दैनंदिन सरासरी ८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू असल्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे तर शनिवार व रविवार अशा दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने सुरू ठेवण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अर्थचक्र प्रभावित झाले होते. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरीत दुकाने अधिकाधिक दिवस बंदच राहिल्याने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. दुसरी लाट ओसरल्याने अर्थचक्राला गती आणि उद्योग क्षेत्राला उभारी म्हणून निर्बंधातून सूट मिळावी असा सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसºया लाटेत उद्योग क्षेत्राला जबर फटका बसला. जुलै महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत अतिशय घट आल्याने सर्व निर्बंध हटविणे अपेक्षीत आहे. अनलॉक केल्यास उद्योग क्षेत्राला उभारी मिळू शकेल. कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी व्यापारी, विक्रेते कटीबद्ध राहतील.- आनंद चरखाजिल्हाध्यक्ष, युवा व्यापारी मंडळ
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने निर्बंधातून सुट मिळणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिक व व्यापारी कोरोनाविषयक नियमांचे पालन करतील. लसीकरणाला गती मिळण्यासाठी लसींचा आवश्यक पुरवठा व्हावा. वाशिम येथे गर्दीच्या ठिकाणी आठवड्यातून एका दिवशी लसीकरण शिबिर घ्यावे.- मनिष मंत्रीजिल्हा सचिव, व्यापारी मंडळ
जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी संख्येत येत असल्यामुळे केवळ रविवारी कडक निर्बंध ठेवावे. उर्वरीत दिवशी सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व व्यापार, उद्योग, दुकाने सुरू ठेवण्यास शासन, प्रशासनाने परवानगी द्यावी. शेवटी अर्थचक्राला गती मिळणेही आवश्यकच आहे. व्यापारी, नागरिकदेखील आवश्यक ती खबरदारी घेतील.- विनोद बसंतवाणीव्यापारी, वाशिम