लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगाम २०१८-१९ करिता वाशिम जिल्ह्यातील गहू (बागायती) आणि हरभरा या दोन पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू असून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. मात्र, या योजनेस शेतकºयांमधून सद्यातरी नगण्य प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे रब्बी पीक कर्ज वाटपाचे उणेपूरे २५ कोटींचे उद्दीष्ट अद्याप ५० टक्केही पूर्ण झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. गहू (बागायती) व हरभरा या पिकांसाठी लागू झालेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कर्जदार शेतकºयांना अधिसूचित पिकांसाठी ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकरी ऐच्छिकरित्या या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. दरम्यान, गहू (बागायती) या पिकासाठी प्रति हेक्टर ३३ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम राहणार असून याकरिता प्रति हेक्टर ४९५ रुपये विमा हप्ता भरावा लागत आहे. हरभरा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर २३ हजार १०० रुपये असून शेतकºयांना ३४६.५० रुपये प्रति हेक्टर विमा हप्ता लागणार आहे. मात्र, एवढी रक्कमही बँकांकडे भरण्यास शेतकरी तयार नाहीत. यापूर्वीच्या पीक नुकसानाची भरपाई अनेक शेतकºयांना अद्याप मिळाली नसल्यानेच शेतकºयांमधून याप्रती उदासिनता बाळगली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रब्बी पीक कर्ज वाटपातही अनेकविध अडथळे निर्माण झाले असून ५० टक्केही उद्दीष्ट अद्याप पूर्ण झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली.
वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेस नगण्य प्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 6:05 PM