निनाद देशमुख / रिसोड : २0१४ मधील अल्प पावसामुळे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाच्या आवकने नीचांक गाठला आहे. २0१४ मध्ये ६५ हजार क्विंटल असलेली सोयाबीनची आवक जून २0१५ अखेर ४३ हजार क्विंटलवर आली. तूर, हरभरा या शेतमालाची आवकही बाजार समितीमध्ये घटली आहे. कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतकरी नानाविध प्रयोग राबवित असल्याने, साहजिकच शेतमालाचे उत्पादनदेखील वाढत आहे. साधारणत: १0-१२ वर्षात शेतमालाच्या उत्पादनात कमालीची वाढ होत असल्याचे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीवरून दिसून येते. शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकर्यांना हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे तसेच शासनाच्या अटी व शर्तींची पूर्तता केल्यानंतर खासगी बाजारांनादेखील परवाने दिले जातात. गत पाच वर्षात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाच्या आवकवर नजर टाकली तर २0१४ या वर्षात शेतमालाच्या आवकने नीचांक गाठला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. २0१४ या वर्षात अत्यल्प पाऊस, विलंबाने झालेली पेरणी, गायब झालेला परतीचा पाऊस, पिकांवरील विविध प्रकारची रोगराई यामुळे शेतमालाच्या आवकमध्ये प्रचंड घट आली आहे.
बाजार समितीत शेतमालाच्या ‘आवक’चा नीचांक
By admin | Published: July 18, 2015 2:16 AM