वाशिम - वाशिम जिल्ह्यातही जनावरांवरील ‘लम्पी’ आजाराची व्याप्ती वाढत असून, ८ ऑक्टोबरपर्यंत ६० गावांतील ५३० जनावरांना संसर्ग झाला. यापैकी ३७ जनावरांचा मृत्यू तर २७० जनावरे बरी झाली असून, सध्या २२३ जनावरांवर उपचार सुरू आहेत.
लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ६० गावांत लम्पीचा शिरकाव झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. लम्पी त्वचारोगामध्ये जनावरांना ताप येणे, त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येणे तसेच तोंडात, घशात व श्वसननलिका, फुफ्फुसांत पुरळ व फोड येतात. तोंडातून लाळ गळती होते तसेच जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते. आतापर्यंत जिल्ह्यातील ५३० जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला. ३७ जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाखांवर जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, २७० जनावरे औषधोपचारातून बरी झाली आहेत. सध्या २२३ जनावरे उपचाराखाली असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले.
बाधित क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिघातील जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्याला वेग देण्यात आला. पशुपालकांनीदेखील गोचीड, गोमाशा यासह बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यात फवारणी, गोठा स्वच्छ ठेवावा, आजारसदृश लक्षणे आढळताच तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला.