वाशिम : रिसोड तालुक्यातील वाकद, सवड व खडकी (सदार) येथे जवळपास २० ते २५ जनावरे लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाने बाधित झाल्याचे आढळून आल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. जिल्हयात या रोगाचा फैलाव होणार नाही याची दक्षत घेवून आवश्यक त्या उपययोजना करण्यासोबतच पशुंचे लसीकरण,गोठयांची फवारणी करण्यासोबतच गोठयांची स्वच्छता ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले.
जनावरांना लम्पी चर्मरोगाचा संसर्ग होत असल्याने, सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात घेण्यात आली. सभेत दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपविभागीय अधिकारी वाशिम, कारंजा व मंगरुळपीर तसेच सर्व तहसिलदार सहभागी झाले तर सभेला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वानखेडे, सर्व गटविकास अधिकारी व तालुका पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते. शण्मुगराजन म्हणाले, ज्या गावांमध्ये या रोगाने बाधित जनावरे आढळून आली आहे, त्या गावाच्या पाच किलोमिटर परिघात येणाऱ्या गावातील गोठयांची फवारणी करुन गुरांचे लसीकरण करण्यात यावे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हयात या रोगाचा संसर्ग रोखण्यासोबतच प्रतिबंध करण्यासाठी औषधी व लस खरेदी करण्यात येईल. बाहेरच्या जिल्हयातून जिल्हयात जनावरे विक्रीसाठी येणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यात यावी. जिल्हयातील सर्व गुरांचे बाजार बंद करण्याबाबत आदेश काढण्यात येईल. एखाद्या पाळीव जनावराला लम्पी सदृश्य आजाराची लक्षणे दिसत असतील तर संबंधित पशुपालकाने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात त्या पशुला घेऊन जावे व आवश्यक ते औषधोपचार करुन घ्यावे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच प्रतिबंधाबाबत पशुपालकांमध्ये जाणीव जागृती गावपातळीवर करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ग्रामपंचायतीची मदत घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.