नंदकिशोर नारे
वाशिम - जिल्ह्यातील एकूण १ लक्ष ६८ हजार ९१ पशुधन असून त्यापैकी आजपर्यंत १ लक्ष ६५ हजार ६१६ गुरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत औषधोपचारातून १६० गुरे बरी झाली असून १७९ गुरांवर उपचार सुरु आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून तसेच पशुसंवर्धन विभागाने देखील गुरांचे लसीकरण केले.
जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा संसर्ग अन्य जनावरांना होवू नये यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी तातडीने लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्याचे निर्देश दिल्याने जिल्हयात मोठया प्रमाणात गुरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे या रोगाचा जिल्हयात संसर्ग रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली.
ज्या पशुपालकांची गुरे लम्पीने बाधित आहे, त्या बाधित जनावरांवर उपचारासाठी येणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे व आपली गुरे लसीकरण व औषधोपचारातून लम्पी रोगमुक्त करावी. तसेच ज्या पशुपालकांनी अद्यापही आपल्या गुरांना लम्पी प्रतिबंधक लस दिलेली नाही, त्यांनी आपल्या गुरांना लस दयावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन समिती सभापती डॉ. श्याम गाभणे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांनी केले आहे.