वाशिम : जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका वगळता अन्य पाच ठिकाणच्या तहसील कार्यालयांसह ३४६ ग्रामपंचायत क्षेत्रात उच्च क्षमतेची इंटरनेट जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी महा नेट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ‘स्टरलाईज’ कंपनीच्या चार लोकांसह ‘जीपीएस’ वाहनाच्या माध्यमातून सद्या सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती महा नेट प्रकल्प व्यवस्थापक शेख जुनेद यांनी गुरूवार, २७ डिसेंबरला दिली.
राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, ग्रामीण भागात कार्यान्वित ‘आपले सरकार सेवा केंद्र’, डिजिटल शाळा आदिंना सदोदित तथा गती असलेल्या ‘इंटरनेट’ची सुविधा पुरविण्यासाठी ठराविक तहसील कार्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये माहिती तंत्रज्ञान महामंडळामार्फत महा नेट प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव, कारंजा आणि रिसोड ही सहाही तहसील कार्यालये आणि त्यातील ४९१ ग्रामपंचायतींचा समावेश होता. दरम्यान, प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या पहिल्या टप्प्यात मंगरूळपीर तालुक्यातील कामे पूर्ण झाली असून मानोरा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसह अन्य चार तालुक्यांमधील तहसील कार्यालये आणि ३४६ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प आता कार्यान्वित केला जाणार आहे.
याअंतर्गत ‘पॉर्इंट आॅफ प्रेझेन्स’ (पीओपी) स्थापित करण्यासाठी आधी ‘नेटवर्क टर्मिनेशन डिव्हाईसेस’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स’ उपकरणे स्थापित केली जाणार असून त्यासाठी लागणारी पर्याप्त जागा, विद्यूतची पुरेशी सुविधा, इलेक्ट्रीक खांबांवरून टाकले जाणारे केबल्स आदींमध्ये कुठलेही अडथळे जाणवू नये, यासाठी ‘स्टरलाईज’ या कंपनीकडून सर्वेक्षण केले जात असल्याचे शेख जुनेद यांनी सांगितले.
सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये एका अध्यादेशानुसार वाशिम जिल्ह्यातील तहसील कार्यालये आणि ग्रामपंचायत परिसरात महा नेट प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील ठराविक पाच तहसील कार्यालये आणि जवळपास ३४६ ग्रामपंचायतींमध्ये आवश्यक ठरू पाहणाºया सुविधांबाबतचे सर्वेक्षण केले जात आहे. - शेख जुनेदप्रकल्प व्यवस्थापक, महा नेट प्रकल्प, वाशिम