लोकमत न्युज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम: येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये महाशिवरात्री उत्सवानिमित्त २२ फेब्रुवारी रोजी १११ क्विंटल पोळ्या, ५१ क्विंटलची भाजी आणि बुंदी मिळून तब्बल १७५ क्विंटलपेक्षा अधिक महाप्रसादाचा वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त संस्थान मध्ये संत महंताासह भाविकांची मांदियाळी पहायला दिसली. शिरपूर व परिसराचे आराध्यदैवत असलेल्या जानगीर महाराज संस्थानमध्ये १५ फेब्रुवारी पासून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता. यानिमित्त संस्थांनमध्ये श्रीमद् भागवत कथा, हरी किर्तन, काकड आरती, प्रवचन, अन्नदान असे कार्यक्रम पार पडले. २१ फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त संस्थानमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती, तर शनिवार २२ फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी शिरपूरसह परिसरातील गावांतील महिलांनी घरी कणिक नेऊन १११ किंव्टल गव्हाच्या पोळ्या तयार केल्या, तर ५१ क्विंटल वांग्याची भाजी संस्थानमध्ये गावकºयांच्या हस्ते तयार करण्यात आली होती. परंपरेनुसार प्रथम या महाप्रसादाचा नैवेद्य जानगीर महाराज यांचे समकालीन मित्र मुस्लिम संत हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्गाहमध्ये अर्पण करण्यात आला. त्यानंतर जानगीर महाराज संस्थानमध्ये जिल्ह्यातील संत महंत यांच्या उपस्थितीत संस्थानचे चौथे मठाधिपती महेशगिर बाबा यांच्या मार्गदर्शनात उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. या महाप्रसादाचा लाभ स्थानिक आमदार अमित झनक, जि. प उपाध्यक्ष डॉ श्याम गाभणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक अंभोरे, पं.स. सदस्य शकीलखाँ पठाण, यांच्यासह हजारो भाविकांनी घेतला. महाशिवरात्री उत्सवाची सांगता रविवारी भव्य शोभायात्रेनंतर होणार आहे. जानगीर महाराज संस्थानमधून निघणाºया पालखी शोभायात्रेत विदर्भ व मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्या व भाविक सहभागी होणार आहेत. पालखी शोभायात्रेतील भाविकासाठी जागोजागी अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे तर इरतकर वेटाळाच्यावतीने बेसन, पोळीचे भोजन ठेवण्यात आले आहे. भाविकांसाठी शुद्ध पाण्याची सुविधामहाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथील शेकडो सेवाधारी महिलांचा एक समूह महाप्रसादासाठी व दर्शनासाठी येणाºया महिलांना मदत करीत होत्या. तसेच सेवाधारी महिला समूहाने महाशिवरात्री उत्सव काळात मंदिर परिसरात स्वच्छता कार्यावर अधिक भर दिला. त्यांच्या कार्याचे लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, महाप्रसादाचा लाभ घेणाºया भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक संघटनांसह, पतसंस्था, जनता बँक,डॉक्टर, मेडिकल संघटना, गणेश मंडळ व दूर्गा मंडळांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
शिरपूर जैन येथे १७५ क्विंटलचा महाप्रसाद; संत, महंतांसह भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 4:04 PM