दरवर्षी आषाढी एकादशीला काजळेश्वर येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर भाविकांनी गजबजून जाते; परंतु गतवर्षीपासून कोरोना संसर्गामुळे धार्मिक सोहळ्यांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मंदिरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पूजा केली जात आहे. यंदाही कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आषाढी एकादशीला निवडक भाविकांच्या पूजेसाठी मंदिर उघडण्यात आले. आषाढीनिमित्त श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मूर्तीची पूजा पुजाऱ्यांनी मानकऱ्यांनी ब्रह्ममुहूर्तावर मंदिरात केली. गतवर्षीपासून कोरोनाचा प्रकोप सुरू असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मंदिर समिती काम करीत आहे. त्यामुळेच आषाढी एकादशीनिमित दरवर्षी गजबजणारे विठ्ठल मंदिर निवडक भाविकांसाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत देवदर्शनासाठी उपलब्ध होते. पिढ्यानपिढ्या विठ्ठल सेवेला समर्पित असलेले संस्थानचे अध्यक्ष अंबादास उपाध्ये यांनी यंदाही मंदिरात महापूजा केली.
---------
वारकऱ्यांकडून घरीच विठ्ठलाची पूजा
गावातील किमान शंभर वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची वारी करतात. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे त्यांची वारी खंडित झाली. कोरोना संसर्गामुळे यंदाही पंढरपूर वारीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील वारकरी व इतर विठ्ठल भक्तांनी घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करून संकट निवारणासाठी साकडे घातले, तर पंढरीची वारी कोरोनामुळे खंडित झाल्याने घरीच विठ्ठल नामाचा जप उपवास करून आषाढी एकादशी साजरी केल्याचे मंदिर सचिव दिगांबर पाटील उपाध्ये यांनी सांगितले.