वाशिम : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाते. यामाध्यमातून सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या ६ महिण्यांपासून या अभियानाचे कामकाज मंदावले असून प्रचार-प्रसारालाही प्रशासनाकडून ‘कोलदांडा’ मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराजस्व अभियानास जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ पासून सुरूवात झाली असून ३१ जुलै २०१८ पर्यंत याअंतर्गत प्रशासनाने कुठली कामे करायची आहेत, यासंदभार्तील निर्देश शासनाने पारीत केले आहेत. त्यानुसार, जिल्हा, तालुका, गावाच्या भूसंपत्तीचे अचूक व्यवस्थापन व नियमन करण्यासाठी शिवारफेरीचे आयोजन करणे, गटनिहाय पोट खराब क्षेत्र सर्वेक्षण नोंदी घेणे, पोत सुधारलेल्या गटांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणे व नोंदी घेणे, सिंचीत क्षेत्राचे सर्वेक्षण, पिके व फळबागांच्या वस्तूनिष्ठ नोंदी घेणे, पाणीपुरवठा साधनांच्या नोंदी घेणे, नदी-नाले-ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती संकलित करणे यासह इतरही विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. असे असताना गेल्या ६ महिन्यांपासून यातील कुठलेच काम व्यवस्थितरित्या होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.
काही महिन्यांपासून निश्चितपणे महाराजस्व अभियानाचे कामकाज जिल्ह्यात थंडावले आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून या अभियानाला गती दिली जाईल. यासंदर्भात महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांनाही सक्त निर्देश दिले जातील.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम