रिसोड (वाशीम): वाशिम जिल्ह्यात मराठा आरक्षणावरुन सरकारचा निषेध नोंदविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी बंद पाळला आहे. या बंदला जिल्ह्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद देण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. तर पेट्रोल पंपधारकांनीही पेट्रोल पंपावर टाळे लावले आहे. मराठा आंदोलक मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यातील रिसोड येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळी जिजाऊ चौकातून सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. याला संपूर्ण व्यावसायिकांनी आपला पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवली. रॅलीचे मोठे रूप पाहून रिसोड पोलिसांनी आपला ताफा वाढविला होता. बंद काळात दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठ शंभर टक्के बंद असल्याचे दिसून आले. याप्रसंगी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने वाशिम नाका येथे ठिय्या आंदोलन करताना सकल मराठा समाज बांधवांचे कार्यकर्ते दिसून आले. तर अनेक मराठा समाज बांधवांनी आपले मुंडन करुन शासनाप्रती निषेध नोंदविला. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये बंदचे पडसाद दिसून आले. गोवर्धन, मोठेगाव, वाकद, भर जहागीर, लहेणी या गावात लोकांनी टायर जाळून रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. तर लोणी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेतयात्रा काढून लोणी येथील रस्त्यावर दफन करण्यात आले. यावेळी रिसोड पोलीसचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली.
खामगावातही बंदसकल मराठा समाजातर्फ गुरुवारी पुकारण्यात आलेल्या बंदला खामगावकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. शहरात कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. ‘खुप लढलो मातीसाठी, आता लढाई आरक्षणासाठी’ व ‘एक मराठा लाख मराठा’ अशा प्रकारच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. ‘एक मराठा लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
शेगावातही बंद सकल मराठा आंदोलनाअंतर्गत आज शहर व ग्रामीण भागात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सकाळी 6 वाजतापासून अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल, शाळा महाविद्यालय, एसटी बसेस, बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. शहरातील चौकात मराठ्यांनी रास्ता रोको केला. सकल मराठा समाजातील विविध संघटना तसेच व्यापारी, अधिकारी, पतसंस्था, बँका, वकील, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार हेही बंदमध्ये सहभागी झाले होते.