लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील १०५२ मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५६.६५ टक्के अर्थात पाच लाख ४३ हजार ३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, तिन्ही विधानसभा मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाले असून, रात्री उशिरापर्यंत आकडेमोड सुरू होती. एकूण ४४ उमेदवारांचे भाग्य यंत्रबंद झाले असून, आता २४ आॅक्टोबर रोजीच्या मतमोजणीची प्रतिक्षा लागून आहे.वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा या तीन मतदारसंघात एकूण ४४ उमेदवार निवडणुकीत मैदानात होते. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघातून १६, वाशिम १३ आणि कारंजा मतदारसंघातील १५ उमेदवारांचा समावेश होता. जिल्ह्यात ५ लाख ४५२ पुरूष, चार लाख ५८ हजार ९० महिला व अन्य १० असे एकूण ९ लाख ५८ हजार ५५१ मतदार आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघातील ३३१, वाशिम ३६९ व कारंजा मतदारसंघातील ३५२ मतदान केंद्रांवर सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदानाचा वेग कमी होता. काही ठिकाणी तूरळक पाऊस पडल्याने मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले नाहीत. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ५.७३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये रिसोड ५.५९ टक्के, वाशिम ६.१५ आणि कारंजा मतदारसंघातील ५.६१ टक्केवारीचा समावेश आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.२० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ५८ हजार ५५१ पैकी ५ लाख ४३ हजार ३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २ लाख ८५ हजार ३६५ पुरूष तर २ लाख ५७ हजार ६६६ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरूष मतदारांची टक्केवारी ५७.०२ तर महिला मतदारांची टक्केवारी ५६.२५ अशी आहे.रिसोड विधानसभा मतदारसंघात तीन लाख ८ हजार ३७८ पैकी एक लाख ८२ हजार ५३ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५९.०४ अशी येते. यामध्ये ९३ हजार ४८३ पुरूष व ८८ हजार ५७० महिला मतदारांचा समावेश आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघात तीन लाख ४८ हजार ७४९ पैकी १ लाख ९२ हजार ९९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, याची टक्केवारी ५५.३४ अशी येते. यामध्ये १ लाख तीन हजार ८७२ पुरूष व ८९ हजार ११९ महिला मतदारांचा समावेश आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात तीन लाख एक हजार ४२४ पैकी एक लाख ६७ हजार ९८७ मतदारांनी मतदान केले असून, याची टक्केवारी ५५.७३ अशी येते. यामध्ये ८८ हजार १० पुरूष व ७९ हजार ९७७ महिला मतदारांचा समावेश आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत तिनही मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत आकडेमोड सुरू होती. त्यानंतर मतदानाची अंतिम आकडेवारी समोर येईल.दरम्यान, जिल्ह्यातील पाच लाख ५७ हजार मतदारांनी कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला घरात बसवायचे याचा फैसला मतदानातून केला आहे. २४ आॅक्टोबरला मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार असून या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
मतदारांचा गोंधळकाही ठिकाणी मतदार यादीत नाव दिसत नसल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. तीन ते चार ठिकाणी काही वेळेसाठी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मतदारांना दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागली. पावसामुळेदेखील मतदारांची गैरसोय झाली. ग्रामीण भागात अनेक मतदान केंद्रासमोर मंडप टाकलेला नव्हता. त्याचा फटका पावसादरम्यान मतदारांना बसला.