वाशिम : सरकारने दिलेली कर्जमाफी अपूर्ण असल्याचा उल्लेख युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा संदेश यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी केला होता. निवडणूक प्रचारादरम्यान सोमवारी रिसोड येथील सभेत कर्जमाफी पुरेशी नसल्याची जाहीर कबुली देत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाना साधला. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात असल्याचे सांगतानाच कर्जमाफी नव्हे, तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मतांचा जोगवाही त्यांनी यावेळी मागितला.शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरीया, शिवसेना उमेदवार विश्वनाथ सानप, डॉ. चंद्रशेखर देशमुख यांच्यासह महायुतीमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आघाडी शासनाच्या १५ वर्षाच्या काळात वाशिमसह राज्यात कोणताही विकास झाला नाही. सध्या विरोधी पक्ष हा झोपलेल्या अवस्थेत असून, महायुतीच्या एकजूटीमुळे विरोधक हे दिसेनासे झाले आहेत. शिवसेनेने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू घेतली असून, राज्य सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीचा लाभ हा सर्व शेतकºयांना मिळाला नसल्याचा पुनरूच्चार केला. शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी मतांचा जोगवाही त्यांनी यावेळी मागितला.शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील कुणी निवडणूक लढविली नाही. पहिल्यांदा माझ्या रूपाने ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात असल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे आदित्य यांनी सांगितले. रिसोड मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात द्या, या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी मी स्वत: घेतो, असे सांगून महायुतीतील बंडखोर उमेदवारांचा समाचार घेतला. प्रास्ताविक विश्वनाथ सानप यांनी केले. तिकिट ‘मॅनेज’ झाल्याची केवळ चर्चाच - गवळीरिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तिकिट ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा, अफवा मध्यंतरी उडाली होती. शिवसेनेचे तिकिट हे शिवसेना पक्ष प्रमुख निश्चित करीत असून, असे कोणतेही तिकिट मॅनेज होत नसल्याचे खासदार भावना गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपा पदाधिकाºयांची अनुपस्थितीभाजपा, शिवसेना महायुती असली तरी वाशिम जिल्ह्यात भाजपातर्फे कारंजा व वाशिम येथे आयोजित जाहिर सभेत शिवसेना पदाधिकाºयांनी हजेरी न लावल्याची बाब भाजपा पदाधिकाºयांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे रिसोड येथील युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेला भाजपा पदाधिकाºयांची उपस्थिती राहणार की नाही याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून होते. भाजयुमो जिल्हाध्यक्ष व अन्य काही कार्यकर्त्यांचा अपवाद वगळता भाजपाचे माजी आमदार अॅड. विजयराव जाधव यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या सभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमधील कटुतेची दरी वाढल्याची चर्चा सभास्थळी ऐकायला मिळाली. बंडखोरांवर साधला निशानामहायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे सांगून बंडखोरांना थारा देऊ नका, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रिंगणात असल्याने आणि या उमेदवारांच्या पाठिशी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी असल्याने आदित्य यांचा हा इशारा नेमका कुणासाठी? अशी चर्चा सभास्थळी रंगली होती.
Maharashtra Assembly Election 2019 : कर्जमाफी अपूर्णच- आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 2:04 PM