रिसोड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार उतरल्या रिंगणात, काय होणार?
By नंदकिशोर नारे | Published: November 8, 2024 06:03 AM2024-11-08T06:03:18+5:302024-11-08T06:04:22+5:30
Maharashtra Assembly Election 2024: वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसाेडमध्ये माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी उडी घेतल्याने काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक रंगतदार होताना दिसून येत आहे.
- नंदकिशोर नारे
वाशिम - जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसाेडमध्ये माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य भावना गवळी यांनी उडी घेतल्याने काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक रंगतदार होताना दिसून येत आहे.
रिसाेड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून अमित झनक (काॅंग्रेस), महायुतीकडून भावना गवळी (शिंदेसेना) व अपक्ष उमेदवार माजी राज्यमंत्री अनंतराव देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. गत २००९ व २०१९ च्या निवडणुकीतही अमित झनक व अनंतराव देशमुख यांच्यातच लढत झाली हाेती. यावेळी भावना गवळी निवडणूक रिंगणात उतरल्याने पूर्णपणे समीकरणे बदललेली दिसून येत आहेत. भावना गवळी व काॅंग्रेसचे झनक दाेघेही पाटील समाजाचे असून, त्यांच्या मताचे विभाजन हाेण्याची दाट शक्यता आहे. अनंतराव देशमुख भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक हाेते; परंतु उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत..
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
- मतदारसंघामधील रस्त्याची कामे न झाल्याने मतदारांचा राेष कायम आहे. या निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांचा मुद्दा कळीचा ठरू शकताे.
-रिसाेड मतदारसंघामध्ये एमआयडीसी नसल्याने राेजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, याकरिता कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही. एमआयडीसी व राेजगाराचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरू शकताे.
- मतदारसंघातील पैनगंगा नदीवरील बॅरेजसचा रखडलेला प्रश्न निकाली न निघाल्याने शेतकऱ्यांसमाेर सिंचनाच्या अडचणी आहेत. हा मुद्दा निवडणुकीत उचलल्या जाऊ शकताे.
- क्रीडा संकुल नसल्याने पाेलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह खेळाडूंना पाहिजे त्या सुविधा मिळत नाहीत. हा मुद्दा निवडणुकीत उपस्थित हाेऊ शकताे.