लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या १८ दिवसांवर आणि उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम मुदत एका दिवसावर येऊन ठेपली असताना ३ आॅक्टोबरला वाशिम मतदारसंघातून केवळ तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. असे असले तरी ४ आॅक्टोबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी होणार असून त्यात विशेषत: अपक्षांची भाऊगर्दी जमणार असल्याची चर्चा रंगत आहे.वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून निवडणूक लढवू इच्छित तब्बल २५ जणांनी मुलाखत दिली होती; मात्र विद्यमान आमदार लखन मलिक यांच्याच नावावर पुन्हा एकवेळ शिक्कामोर्तब होऊन त्यांना ‘रिपीट’ करण्यात आले.मतदारसंघात विकासकामांचा पुरता फज्जा उडालेला असला तरी २००४ च्या निवडणूकीची पुनरावृत्ती होऊन मतदारसंघ हातचा जायला नको, म्हणून उमेदवार बदलाची ‘रिस्क’ भाजपाने घेतली नसल्याची चर्चा होत आहे. यामुळे मात्र पक्षांतर्गत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून उघडपणे नव्हे; पण दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे २०१४ च्या निवडणुकीत युतीशिवाय लढलेल्या शिवसेनेने या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते खेचली होती. आता युतीमुळे सेनेला माघार घ्यावी लागली असली तरी या पक्षातूनही काही मंडळीना मलिक ‘रिपीट’ नको होते. या नाराजीनाट्यामुळे भाजपा व शिवसेनेतीलच काही चेहरे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे.काँग्रेसमधूनही अनेकांकडून होऊ शकते बंडखोरीवाशिम विधानसभा मतदारसंघात कधीकाळी वर्चस्व गाजविणाºया काँग्रेस पक्षाची सद्या मात्र विविध पातळ्यांवर पडझड झाली आहे. पक्षातील काही जुन्याजाणत्या चेहऱ्यांनी पक्षाला नवी उभारी देण्याचे प्रयत्न चालविले आहेत; मात्र विधानसभा निवडणूक लढण्याकरिता इच्छूक असलेल्या जाणत्या चेहºयांना डावलून पक्षाने अनेकांच्या लेखी अनोळखी असलेल्या रजनी महादेव राठोड यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराजी व्यक्त केली जात असून या पक्षातूनही अनेकांकडून यामुळेच बंडखोरी होऊन अपक्ष उमेदवारी दाखल केली जाऊ शकते, असे बालेले जात आहे.
शिवसेनेतूनही नाराजी!२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपा व शिवसेनेने वाशिम मतदारसंघात स्वतंत्ररित्या उमेदवार उभे केले. विशेष म्हणजे भाजपाच्या लखन मलिक यांना शिवसेनेच्या शशीकांत पेंढारकर यांनी काट्याची टक्कर देऊन दुसºया क्रमांकाची मते खेचली होती. यंदा मात्र युती होऊन पुन्हा मलिक यांनाच उमेदवारी दिल्याने सेनेतून नाराजी व्यक्त होत असून पेंढारकर हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.राजकीय घडामोडींवर लक्षवाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची गर्दी होती त्यामुळे तिकीट वाटपानंतर अनेकांचा हिरमोड झाल्याने बंडखोरीची शक्यता पाहता सर्वच राजकीय पक्षांनी नाराज इच्छुक उमेदवारांच्या बारीक-सारीक घडामोडीवर लक्ष ठेवण्यास सुरु केले आहे.