वाशिम : वृक्षारोपण, संगोपन, वन्य व वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण केलेल्या महाराष्ट्र हरित सेनेमध्ये सदस्यांची नोंदणी करण्याकरिता प्रशासकीय विभागांचे उद्दिष्ट निर्धारित करण्याबाबत ७ सप्टेंबर रोजी शासनाने परिपत्रक जारी केले आहे. या अंतर्गत राज्यातील जिल्ह्यांना ५३ लाख ५ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असून, यामध्ये पश्चिम वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यासाठी २३ हजार, बुलडणा ४८ हजार, तर वाशिम जिल्ह्यासाठी ५० हजार, असे एकूण १ लाख २१ हजार उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.नियोजित ५० कोटी वृक्ष रोपणाचा व संगोपनाचा कार्यक्रम जन चळवळीत रूपांतरित करून यशस्वीरीत्या राबविण्यासाठी लोकसहभाग गरजेचा असल्याने ४ जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र हरित सेना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती व मोबाइल अप्लिकेशनसुद्धा तयार करण्यात आले होते. याद्वारे एक कोटी लोकांनी सदस्य नोंदणी करावी, असे अपेक्षित होते; परंतु ते शक्य झाले नाही. यामध्ये ५३.५० लाख सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. ही सदस्य नोंदणी वन, सामाजिक वनीकरण आणि वन विकास महामंडळाकडून केली जात असल्याने यास मर्यादा पडत आहेत. त्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समाजातील सर्व घटकांना उद्युक्त करण्यासाठी सहभाग नोंदविल्यास सर्व विभागाच्या प्रयत्नाने सदस्य नोंदणीचे लक्ष्य लवकर गाठणे शक्य होईल. या बाबीचा विचार करून शासनाच्या महत्त्वाच्या प्रशासकीय विभागाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. हे उद्दिष्ट ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.