- संतोष वानखडेवाशिम - लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे जिल्ह्यातील ८ लाख ९८ हजार ७४३ मतदारांना वोटर स्लिपचे घरपोच वाटप करण्यात आले.
या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, असा संदेश देणारे पत्र जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी मतदारांना पाठवले आहे. लोकशाही व्यवस्थेने प्रदान केलेला मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराला बजावता यावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यंदा कमालीचा आग्रही आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे आणि मतदानाचा टक्का वाढावा, याकरीता निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाची निवडणूक शाखाही सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.
मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक शाखेकडून घरोघरी मतदार चिठ्ठ्या वाटप केल्या. मतदार चिठ्ठ्या (वोटर स्लिप) वाटपाचे काम पुर्णत्वाकडे आले. अकोला लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील वाशिम व कारंजा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. रिसोड, वाशिम व कारंजा असे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून जिल्ह्यात ९ लाख ७९ हजार २३७ मतदार आहेत. २५ एप्रिलपर्यंत ९१.७८ टक्के अर्थात ८ लाख ९८ हजार ७४३ मतदारांना वोटर स्लिप वाटप करण्यात आल्या. या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे मतदान करण्याबाबतचे आवाहनपर संदेशपत्रक वाटप करण्यात आले. या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.