वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा २०१८, रविवार १० जून २०१८ रोजी वाशिम शहरातील दहा परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या दहाही परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आहेत.
महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, तुळशीराम जाधव महाविद्यालय, हॅपी फेसेस स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय तंत्र निकेतन व श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा या दहा परीक्षा उपकेंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. परीक्षा उपकेंद्रावर एकाचवेळी चारपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. हा आदेश १० जून २०१८ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत कायम राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले. महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र परीक्षार्थींनी स्वत: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. परीक्षेस येताना प्रवेशपत्रासोबतच स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही दोन मूळ ओळखपत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी व ती स्वत:च्या स्वाक्षरीसह समवेक्षकाकडे जमा करणे अनिवार्य आहे.
परीक्षेमध्ये कॉपी, गैरप्रकार करताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची पोलिस कर्मचाºयांकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.