लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे बारावे वर्ष १५ आॅगस्ट २०१८ पासून सुरु होत असून सर्व ग्राम पंचायतींनी १५ ते ३० आॅगस्ट २०१८ या कालावधीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविली जात आहे. तंटामुक्त गाव समितीने गावामध्ये जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि अनिष्ठ प्रथांचे निर्मुलन करण्यासाठी गाव पातळीवर विविध उपक्रम राबविणे अपेक्षीत आहे. एक गाव-एक गणपती, गणेशोत्सव व गणपती विसर्जन मिरवणूक विना पोलीस बंदोबस्तात करणे, अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे, अनिष्ठ चालीरीती, परंपरांना प्रतिबंध करणे, गावामध्ये संपुर्ण दारुबंदी करणे, गावामध्ये विविध उत्सवांमधून समाजोपयोगी उपक्रम राबविणे, गावामध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करुन रात्रीगस्त सुरु ठेवणे, वनसंवर्धन व वन संरक्षणाकरीता प्रयत्न करणे, गावपातळीवर घेण्यात येणाऱ्या विविध निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी व बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणे, आदी उपक्रम समितीमार्फत राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षातील तंटामुक्त गाव समितीचे कामकाजाला १५ आॅगस्टपासून सुरूवात होत आहे. १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्टदरम्यान ग्रामसभेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी लागणार आहे. तंटामुक्त गाव समितींना आपले अध्यक्ष, सदस्य बदलावयाचे असल्यास त्यांनी याच कालावधीमध्ये हा बदल करावा, असे अशा सूचना पोलीस विभागाने दिल्या. एक तृतीयांशपेक्षा जास्त समिती सदस्य बदलू नयेत. मोहिमेमध्ये सहभाग घेतल्याबाबतचा ठराव व समितीचे अध्यक्ष, सदस्य यांचे नावाची यादी संबंधीत पोलीस स्टेशनला १ सप्टेंबर २०१८ पूर्वी सादर करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.तंटामुक्त गाव समितीने गावामधील दाखल असलेल्या दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंट्याची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत गोळा करावी. समितीतर्फे ग्रामस्थांना आवाहन करुन त्यांचेकडील तंटे, त्यांच्यातील वाद याबाबत माहिती मागवावी. समितीस सुयोग्य वाटेल त्या पध्दतीने व आवश्यकतेनुसार घरोघरी जावून समिती माहिती गोळा करेल, त्याचबरोबर संबंधीत पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय व न्यायालय यांचेकडून प्रलंबीत असलेल्या तंट्याची माहिती घेऊन तंटे मिटविण्याकरीता प्रयत्न करावा, असे आवाहनही पोलीस विभागाने केले.