संतोष वानखडे
वाशिम : जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने इच्छुक उमेदवारही संभ्रमात आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने दोन सदस्यांना डच्चू देत अन्य उमेदवाराला पसंती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. आता पोटनिवडणूक लागल्याने सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरूद्ध दंड थोपटून निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. माजी खासदार अनंतराव देशमुख आणि माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे उमेदवार आखाड्यात उतरवून प्रमुख पक्षांसमोर आव्हान निर्माण केले. जनविकास व वंचित बहुजन आघाडीचे आव्हान परतवून लावण्यासाठी राकाँ, काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीबाबत बैठका घेतल्या. परंतु, जागा वाटपावरून अद्याप तोडगा निघाला नसून, चर्चेभोवतीच महाविकास आघाडी फिरत असल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात असल्याचे दिसून येते.
०००००००००००००००००
एकमेकांविरूद्ध अर्ज दाखल !
महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने जि.प. गट व पं.स. गणात तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विश्वसनीय सूत्रांनुसार महाविकास आघाडीची शक्यता मावळली असून, या तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून आपापल्या सर्कलमध्ये प्रचारही सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.