वाशिम : संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे जैन धर्माचे २४ वै तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव रविवारी (दि.२१) वाशिम शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.
सत्य,अहिंसा, अपरिग्रहाचे पुरस्कर्ते तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त शहरातील महावीर चौक येथे सकल दिगंबर समाजातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲड.सुरेंद्रकुमार बाकलीवाल, ज्ञायक राजेंद्र पाटनी, रमेशचंद्र बज, प्रकाशचंद गोधा, श्रेणिक भुरे, विनोद गडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे ध्वजगीत आर्यनंदी पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. भविष्यात सकल जैन समाजाचे संघटन व वैचारिक एकोपा प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सकल जैन समाजातील सर्वच श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सर्वच कार्यक्रमात सहभागी झाले होते.
वाशिम शहरातून शोभायात्राभगवान महावीर यांची प्रतिमा रथात स्थापन करून वाशिम शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीर चौक येथून शोभायात्रेला प्रारंभ होवून बालू चौक,सुभाष चौक,टिळक चौक,दंडे चौक,आचार्य विद्यासागर मार्ग,काटीवेश मार्गे परतीचा प्रवास करून महावीर चौकात पोहोचली. शोभायात्रेत पुरुषांनी परिधान केलेले श्वेत वस्त्र तर महिलांनी परिधान केलेले केशरी पिवळे वस्त्र मिरवणुकीचे लक्ष वेधून घेत होते. शांततेच्या माध्यमाने भगवान महावीरांचा जयघोष करत जैन चौक येथे दीप प्रज्वलन व आरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.