वाशिम : कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यात भगवान महावीर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कुठेही गर्दी होऊ नये, म्हणून भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव रद्द करीत मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
कोरोनामुळे वाशिम शहरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले होते. आचार्य भगवंत १००८ श्री हिराचंद्रजी महाराज यांच्या परमशिष्या महासती चारित्रालताश्रीजी, साध्वीश्री भावनाश्रीजी, साध्वीश्री प्रीतिश्रीजी व साध्वीश्री गरिमाश्रीजी यांनी कोरोना महामारीच्या अनुषंगाने भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव साध्या पद्धतीने आपापल्या घरात जप-तप, सामायिक, प्रतिक्रमण इत्यादी धार्मिक क्रियेद्वारे साजरा करावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार, समाजबांधवांनी साध्या पद्धतीने घरातच जयंती साजरी करून कोरोनाचे संकट टळू दे, जगातून कोरोना विषाणू संसर्ग हद्दपार होऊ दे, अशी प्रार्थना केली.