मानोरा तालुक्यात ७७ ग्रामपंचायती आणि १३३ गावे असून, पंचायत समितीच्या सभापतिपदी सागर प्रकाश जाधव कारभार पाहत आहेत. यासह उपसभापती म्हणून अंजली राऊत यांच्याकडे धुरा आहे. दरम्यान, आता नव्याने गटविकास अधिकारी म्हणून जयश्री वाघमारे यांनी आज कारभाराची सूत्रे हाती घेतली. वाघमारे पूर्णकालीन गटविकास अधिकारी म्हणून कार्य करणार आहेत. त्या यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मानोरा तालुक्यातील सर्व गावांमध्ये शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत नागरिकांना एकसमान न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. गटविकास अधिकारी म्हणून रुजू झालेल्या वाघमारे यांचे जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर पंचायत समिती सभापती सागर जाधव यांनी स्वागत केले. या छोटेखानी कार्यक्रमास धावंडाचे सरपंच प्रकाश जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.
मानोरा पंचायत समितीत ‘महिलाराज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:45 AM