रिसाेड : शहरातील ३० हजार नागरिकांना काेराेनाची लस देण्याचा संकल्प केलेल्या समता फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषाेत्तम अग्रवाल यांची ‘लाेकमत’ने मुलाखत घेतली असता, जनसेवा हेच फाउंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
काेराेना लसीकरणाचा उपक्रमाबाबत काय सांगाल?
संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या काेराेनाने सर्व क्षेत्रावर परिणाम केला. यावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण हाेय. हीच बाब हेरून शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला, तसेच लसीकरणाच्या दुसऱ्या डाेसबाबतही आपण सकारात्मक असून, शासनाच्या अधिन राहून तेही कार्य पूर्ण करण्याचा आपला मानस आहे.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत काही भूमिका आहे का?
मुलाच्या लसीकरणाबाबत माझी भूमिका सकारात्मक असून, अजून लसीबाबत लहान मुलावर प्रयोग सुरू आहेत. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर, लहान मुलांनाही लस देण्याबाबत माझा मानस आहे. माझी प्रबळ इच्छाशक्ती आहे, परंतु शासनाचे धोरण काय असणार, यावर ते अवलंबून राहणार आहे.
समता फाउंडेशनचे रोपटे कसे वृद्धिंगत झाले?
३५ वर्षांपूर्वी समता फाउंडेशन या नावाने बीज रोपण केलं आणि जनसेवा या उद्देशाने नेत्रदान यासाठी प्रथम पाऊल टाकलं व लाखो लोकांचे नेत्रशस्त्रक्रिया करण्याचं मला भाग्य मिळाले. पुढेही समता फाउंडेशन सामान्यांची सेवा करणे हाच उद्देश असून, त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार. सर्वात प्रथम सर्वांचे लसीकरण करणे, त्याकरिता नागरिकांना प्रवृत्त करणे. ४०० गावांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करणे हे आमचे सध्याचे ध्येय आहे, तसेच जनकल्याणासाठी माझ्याकडे भरपूर संकल्पना असून, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
लसीकरणाबाबत नागरिकांना काय आवाहन कराल?
कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण हाेय. प्रत्येक नागरिकाने लसीकरण करावे व इतरांनाही करण्यास सांगावे, असे आवाहन मी करताे.